Saturday, March 28, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनवीन टाकळी बालक मृत्युप्रकरण; जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना सुनावली ५ वर्षांची...

नवीन टाकळी बालक मृत्युप्रकरण; जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना सुनावली ५ वर्षांची सक्त मजुरी

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूरचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.एन.पांढरे यांनी आरोपी अनिल देवानंद लाड व गोवर्धन देवानंद लाड,दोघेही राहणार नविन टाकळी,ता.दक्षिण सोलापूर यांना बालकाच्या मृत्यूप्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १,००० रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना शिक्षा आणि फिर्यादी यांना आरोपी यानी प्रत्येकी दीड लाख रुपये प्रमाणे एकूण तीन लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

या प्रकरणासंबंधी सविस्तर हकिकत अशी की,आरोपींनी त्यांच्या नविन घराचे शौचालय बांधण्याकामी धोकादायक खड्डा खोदून त्यामध्ये कोणी पडले असता त्याचा जीव जावू शकतो, याची जाणीव असताना सुध्दा त्यांना फिर्यादी आणि इतरांनी वारंवार खड्डा बुजविण्याबाबत तसेच ग्रामपंचायतीने नोटीस देवूनसुध्दा आरोपींनी सदरचा खड्डा जाणीवपूर्वक न बुजविल्यामुळे दि.६ मे २०२१ रोजी सायं.५.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बिरप्पा नामदेव उडगी यांचा मुलगा श्रेयस (वय वर्षे ५) हा खेळत असताना तो पाणी असलेल्या खडडयात पडून त्याचा दुर्दैवी अंत झाला.त्यामुळे फिर्यादी यांनी मंद्रुप पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली.त्यानुसार गुन्हा दाखल होवून तपासिक अंमलदार श्री. आसादे,पोलीस उप निरीक्षक अमितकुमार करपे यांनी तपास करुन आरोपींविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. यात सरकारपक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यातआले. सरकारपक्षाचा पुरावा आणि युक्तीवाद ग्राहय धरुन दोन्ही आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.एन.पांढरे यांनी आरोपी अनिल देवानंद लाड, गोवर्धन देवानंद लाड,दोघेही राहणार नविन टाकळी,ता.दक्षिण सोलापूर यांना बालक श्रेयस याच्या मृत्यूप्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी तसेच प्रत्येकी १ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक महिना शिक्षा आणि फिर्यादी यांना आरोपी यांनी प्रत्येकी दीड लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश कोर्टाने केला आहे. या प्रकरणात सरकारपक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अँड.अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.तर आरोपीच्या वतीने अँड.ए.एन.शेख यांनी काम पाहिले.कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उप निरीक्षक विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या