जळगाव/तुषार वाघुळदे/कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह:- पाचोरा येथील जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक संदीप महाजन यांना नगरपालिका समोर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी मारहाण केली, हे कृत्य अशोभनीय असल्याचा सूर सुजाण नागरिकांमध्ये उमटला आहे.शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार व साप्ताहिक ध्येय चे संपादक संदीप महाजन यांनी केला आहे.अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर स्थानिक पत्रकार महाजन यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. परंतू पोलिसांनी या विषयाला गांभीर्याने घेतले नाही.तसेच मला काहीही झाल्यास त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील आणि त्यांचे सहकारी असतील असं सुद्धा म्हटले होते.दरम्यान, आज (गुरूवारी) सकाळी याच स्थानिक पत्रकाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.हा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे. आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनीच मला मारहाण केली, असा आरोप संबंधित मारहाण झालेल्या स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. यापुढेही माझ्या आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका आहे. पोलिसांनी आता तरी संरक्षण द्यावे, असं पत्रकार महाजन म्हणाले.
ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी यांनी चांगलेच खडे बोल….
पाचोरा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक पत्रकार महाजन यांना अश्लील शिवीगाळ केल्याचं प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. त्यानंतर किशोर पाटील समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पत्रकाराने केला आहे. याच प्रकरणावरून किशोर पाटील यांची बहीण आणि ठाकरे गटातील नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.किशोर पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार आहेत. सेनेतील फुटीनंतर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. तर त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी मात्र ठाकरेंच्या पाठीशी ठाम राहिल्या. राजकीय मैदानात एकमेकांच्या आमनेसामने असलेली ही भावंडं कौटुंबिक समारंभांना मात्र एकत्र दिसत. ठाकरे गट आणि शिंदे गट असे असून पाचोरात बहीण भावात वातावरण चांगले तापले आहे. परंतू पाटील यांच्या समर्थकांनी पत्रकाराला मारहाण केल्याचा आरोप झाल्याने आता वैशाली सुर्यवंशी भडकल्या असून त्यांनी भावाचे ( आमदार किशोर पाटील ) कान उपटले आहेत. दरम्यान पत्रकाराला मारहाण करण्यात दिल्याबद्दल अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे.

