भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित रहावी यासाठी शहर परिसरातील सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या उपद्रवींविरोधात भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात शहर, बाजारपेठ आणि तालुका पोलीस प्रभारींनी हद्दपारीसह एमपीडीएच्या कारवाईचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले. त्या अनुषंगाने उपद्रवींविरोधात धडक कारवाईचा सपाटा सुरू असताना अट्टल गुन्हेगार आतीश रवींद्र खरात (27, समतानगर, भुसावळ) याच्याविरोधात एमपीडीए करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतेच काढल्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. संशयिताची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर शहरातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.आगामी काही दिवसात आणखी काही उपद्रवींवर मोठी कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .संशयित आतीश खरात विरोधात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणे, अत्यावश्यक लागणार्या वस्तूंचा काळा बाजार, बेकायदेशीर हत्यार घेवून परिसरात दहशत माजविणे, गावठी दारूची विक्री केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन तर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चार असे सात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भुसावळ शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी धोकादायक व्यक्ती या संज्ञेचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला होता. त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी या प्रस्तावाचे अवलोकन करून एमपीडीए कायद्यांगर्तत गुन्हेगार खरात याला एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्याच्या आदेशाला 31 जुलै रोजी मंजुरी दिली होती मात्र संशयित सापडत नसल्याने त्याचा शोध सुरू असताना संशयिताला 24 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे तसेच पोलीस निरीक्षक पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, निलेश गायकवाड, अनिल चौधरी, संजय पाटील, संदेश निकम, सोपान पाटील, भूषण चौधरी, योगेश घुगे यांनी संशयिताला अटक करीत येरवडा कारागृहात स्थानबध्द केले. दरम्यान, एमपीडीए प्रस्तावाकामी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने सहकार्य केले. जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत आहे.
कुविख्यात गुन्हेगार आतीश रवींद्र खरात स्थानबद्ध – येरवडा जेलला हलविले
RELATED ARTICLES