कोंडाईबारी घाटाजवळ झाला अपघात.. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे हलविले रुग्णालयात…
धुळे/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- नंदुरबार येथील धुळे-सूरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाजवळ आज बुधवार दुपारी एक वाजेदरम्यान एसटी बसचा (एमएच 20 बीएल 3377) अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, धुळे- सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्यावर डुक्करझिरे गावाच्या परिसरात वापी (गुजरात) येथून यावलला (जळगाव) येथे जाणाऱ्या महाराष्ट्र महामंडळाच्या एसटी बसचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे बसच्या पुढे जात असलेल्या मालवाहू ट्रकला जबर धडक दिल्याने बसमधील सात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.अपघातात या एसटी बसचा पुढील भाग चक्काचूर झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा अपघात दुपारी एक वाजता घडला. जखमीची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.
घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले.अपघात झाल्यानंतर जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
एस टी बसेस जुन्या व नादुरूस्ती चे प्रमाण जास्त असल्यामुळे एका पाठोपाठ एक असे एसटी महामंडळाच्या बसेसच्या अपघातांचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. एसटी बसेस मध्ये प्रवाशांसह वाहक आणि चालकांना देखील जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांमध्ये एसटीच्या अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.