Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभुसावळात गोळीबार..! संतोष बारसे व सुनील राखुंडे ठार.

भुसावळात गोळीबार..! संतोष बारसे व सुनील राखुंडे ठार.

भुसावळ/ मुख्य संपादक चंदन पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह :- काल रात्री शहरातील जुना सातारा परिसरातील मरिमाता मंदिर परिसरात झालेल्या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण भुसावळ गोळीबाराने हादरले असून पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंतेचा विषय बनलेली आहे.

काल रात्री साडेनऊच्या सुमारास भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरातील मरिमाता मंदिर परिसरात गोळीबार झाला. यात सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक संतोष बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार माजी नगरसेवक संतोष बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे दोन्ही जण कार मधून राष्ट्रीय महामार्गाकडून जुना साताराच्या रस्त्याने शहरात येत असतांना हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.

याबाबत परिसरात वार्ता पसरताच तेथे उपस्थित नागरिकांनी या दोघांना प्राथमिक उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. परत तेथून शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. संतोष बारसे यांचे वडील मोहन बारसे यांचा देखील आधी खून झाला होता. संतोष बारसे हे माजी नगरसेवक होते तर त्यांच्या सौभाग्यवती उपनगराध्यक्षा होत्या. सुनील राखुंडे यांनी अल्प काळात त्यांनी सामाजिक कार्यात नाव मिळवले.आगामी काळात ते राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होती.

या घटनेची माहिती मिळताच संतोष बारसे आणि सुनील राखुंडे समर्थकांनी तात्काल घटनास्थळी धाव घेतली. यानंतर समर्थक मोठ्या संख्येने रूग्णालयात दाखल झाले होते. पोलीस अधिक्षक एम. महेश्‍वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरिक्षक गजानन पडघन यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी भुसावळ शहरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या