जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील शिरसोली ते दापोरा रस्त्यावर शुक्रवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी प्रकारात विजेच्या शॉकने एका गाभण म्हशीचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संबंधित पशुपालकाचे जवळपास ९० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
शिरसोली येथील माजी ग्रामपंचायत सदस्य शेख रऊफ शेख मुजाहिद (वय ५९) यांनी आपल्या मालकीच्या काही म्हशी चारण्यासाठी शुक्रवार, दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास दापोरा रस्त्याकडे नेल्या होत्या. चरत असताना त्यातील एक गाभण म्हैस रस्त्यालगत असलेल्या विजेच्या खांबाजवळ गेली. त्या खांबावरून लोंबकळणाऱ्या जाड तारेतून विद्युत प्रवाह उतरलेला असल्यामुळे म्हशीला तीव्र विद्युत शॉक बसला आणि ती जागीच कोसळली.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शेख रऊफ यांच्या मते, संबंधित म्हैस गाभण असून तिची अंदाजे किंमत सुमारे ९० हजार रुपये होती. या अपघाती मृत्यूमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असून महावितरणकडून निष्काळजीपणाचा आरोप होत आहे. विद्युत यंत्रणांची देखभाल वेळेवर न केल्यास असे प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

