जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील पाण्याच्या टाकी जवळ अड्डा लावून देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत मुद्देमालासह एका आरोपीस अटक केली आहे. सदर कारवाई ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क, जळगाव बिट क्र. २ चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नशिराबाद येथील पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावरील पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेल्या जागेवर छापा टाकून एकुण २६४०/- रुपयांचा अवैध दारूचा साठा हस्तगत केला आहे. यामध्ये देशी दारूच्या टँगो पंच भरलेले १८० मिलीचे ३२ सिलबंद बाटल्या, तसेच पाच काचेचे ग्लास यांचा समावेश आहे.
सदर प्रकार महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ई अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारवाईदरम्यान शेख रईस अब्दुल कादीर (वय ५१ वर्षे, रा. निचवाच मोहल्ला, नशिराबाद ता .जि- जळगाव) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी डी. एस. पावरा (वय ३५ वर्षे) यांनी तक्रार दाखल केली असून, पुढील तपास प्र. दु. नि. अशोक प्र. ताजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

