Saturday, March 28, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्या"माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी ; विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन"

“माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी ; विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन”

चोपडा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘माहिती अधिकार दिन’ शासकीय कार्यालयात साजरा करण्यात यावा, अशी मागणी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम (नाशिक विभाग) आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (जळगाव) यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात गायकवाड यांनी नमूद केले की, माहिती अधिकार कायदा हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे. या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर शासन निर्णय क्रमांक – केमाअ २००८/ पत्र क्र. ३७८/०८/ सहा, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई दिनांक २० सप्टेंबर २००८ अन्वये प्रत्येक शासकीय कार्यालयात दरवर्षी २८ सप्टेंबर हा ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करण्याचे आदेश आहेत.

गायकवाड यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, यावर्षी २८ सप्टेंबर हा रविवार असून २७ सप्टेंबर शनिवारची सुट्टी आहे. त्यामुळे माहिती अधिकार दिनाचे आयोजन २६ किंवा २९ सप्टेंबर २०२५ रोजी करण्याचा पर्याय विचारात घ्यावा व त्या अनुषंगाने अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयांना तात्काळ सूचना द्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.

तसेच, या दिनानिमित्त माहिती अधिकार कायद्यावर आधारित उपक्रम राबवून शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणीही गायकवाड यांनी केली. यामध्ये व्याख्यानमाला, चर्चासत्र, प्रश्नमंजुषा, निबंध, वकृत्व स्पर्धा, माहिती अधिकार कायद्यावर आधारित प्रदर्शन तसेच स्थानिक संस्था व शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने सुचविलेल्या या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून माहिती अधिकार दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या