भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहरात एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न होत असतानाच, दुसरीकडे आदर्श शाळेबाहेर असलेल्या तीन मोठ्या वृक्षांची विनापरवाना कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वृक्षतोडीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.आदर्श शाळेबाहेरील झाडे तोडली जात असल्याचे पाहून सजग नागरिकांनी तात्काळ ‘पर्यावरण संवर्धन व विकास समिती’चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र वराडे (अप्पा) आणि तालुकाध्यक्ष पवन नाले यांना पाचारण केले. माहिती मिळताच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या गंभीर प्रकरणाबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ नगरपालिका अधिकारी धनराज बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला. “आदर्श शाळेला वृक्षतोडीसाठी पालिकेने परवानगी दिली आहे का?” असा प्रश्न विचारला असता, बाविस्कर यांनी स्पष्ट केले की, “नगरपालिकेने शहरात कोणालाही वृक्षतोड करण्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही.” नगरपालिकेची परवानगी नसतानाही भरदिवसा ही वृक्षतोड कोणाच्या वरदहस्ताने झाली? असा संतप्त सवाल देवेंद्र वराडे, पवन नाले आणि उपस्थित नागरिकांनी उपस्थित केला आहे. परवानगी नसताना झाडे तोडण्याचे धाडस करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
या वृक्षतोडीमुळे शहराच्या हरित पट्टयाचे नुकसान झाले असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पर्यावरण प्रेमींनी दिला आहे.

