जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन; पिलखेड्यात जैव निविष्ठा संसाधन केंद्राचा शुभारंभ
पिलखेडा | विशेष प्रतिनिधी:- बळीराजाच्या जीवनाशी अतूट नाते असलेला पोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करताना शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची तसेच निसर्गपूरक पद्धतींची जोड देणे आवश्यक आहे. वाढता उत्पादन खर्च, जमिनीचा खालावणारा पोत आणि पर्यावरणाचा समतोल लक्षात घेता शेतकऱ्यांनी नैसर्गिक व आधुनिक शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.पिलखेडा येथे कृषी विभाग व आत्मा (ATMA), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोळा उत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेतकऱ्यांसोबत पोळा सण साजरा केला. तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी पारंपरिक शेती पद्धतींसोबत नैसर्गिक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. कृषी विभाग व आत्माच्या माध्यमातून राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनच्या योजनांचा लाभ गावागावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान पिलखेडा येथे जैव निविष्ठा संसाधन केंद्राचा (Bio Input Resource Centre – BIRC) शुभारंभ करण्यात आला. नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेले जैविक घटक, जीवामृत, बीजामृत तसेच वनस्पतीजन्य अर्क स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा उद्देश आहे. या केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक निविष्ठा उपलब्ध होऊन स्वयंपूर्णतेला चालना मिळण्यास मदत होणार आहे.यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिरेकी वापर टाळण्याचा तसेच ‘विषमुक्त शेती करून क्लेशमुक्त जीवन जगण्याचा’ सामूहिक संकल्प केला. मातीचे आरोग्य जपणे आणि नागरिकांना सुरक्षित व विषमुक्त अन्नधान्य उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, मंडळ कृषी अधिकारी शरद पाटील, उप कृषी अधिकारी योगेश अत्रे, सरपंच रोहिणी साळुंखे, तेजल चौधरी, डॉ. अतुल चौधरी, राजेंद्र चौधरी, किशोर चौधरी, भावलाल साळुंखे, योगराज भालेराव, पंकज चौधरी यांच्यासह कृषी व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, कृषी सखी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.