जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील कालिंका माता परिसरातील कौशिकी भारत गॅस एजन्सीकडून नियमित गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिलेंडर बुकिंग करूनही वेळेत डिलिव्हरी मिळत नसल्याने ग्राहकांना वारंवार एजन्सी व गोडाऊनच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.ग्राहक लता शिरसाठ, रमेश टी. चव्हाण, इमरान खान गुलशेर खान, इकबाल इब्राहिम पठाण, बोलके गोपाळ जी, भंगाळे सोपान चिंधू यांच्यासह सुमारे १० ते १२ ग्राहकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित ग्राहकांनी सांगितले की, १ मे रोजी सिलेंडर डिलिव्हरीचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला होता. मात्र प्रत्यक्षात गोडाऊनवर सिलेंडर घेण्यासाठी गेल्यानंतर “तुमचे नाव यादीत नाही” असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले.
यामुळे ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून वेळेचा देखील अपव्यय होत आहे. नियमित गॅस पुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल होत असून एजन्सीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकाराकडे संबंधित भारत गॅसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तक्रारींचे तात्काळ निवारण करावे, तसेच पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

