जळगाव | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा. विद्यालयात महाकवी कालिदास दिनानिमित्त बुधवारी (दि. १५ जुलै) विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्कृत मंडळाची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.भैय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, पर्यवेक्षक संजय वानखेडे, रमा तारे तसेच संस्कृत विभाग प्रमुख पद्मजा जोशी यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता आणि महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी संस्कृत मंडळाची औपचारिक स्थापना करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत शिक्षिका संगीता पानट यांनी केले. विद्यार्थिनी खुशी रिल हिने ‘श्रीहरीस्तोत्रम्’ या स्तोत्रावर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यानंतर विद्यार्थ्यांनी महाकवी कालिदास यांच्या साहित्य, कार्य आणि संस्कृत भाषेच्या समृद्ध परंपरेविषयी मराठी व संस्कृत भाषेत माहिती सादर केली. तसेच ‘सरसर आयंती वर्षधारा’ आणि ‘कालिदास गीत’ यांचे सादरीकरणही करण्यात आले.महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित नाटिकेचे संस्कृतमधील विवेचन ज्येष्ठ शिक्षिका पद्मजा जोशी यांनी केले. या नाटिकेचे मराठी सादरीकरण लावण्या महाले, टिशा नेहेते, विनय पाटील, प्रज्वल साळुंखे, उदय भालेराव, योगेश्वरी धनगर, कृष्णा तांबट, गिरीश भारुळे आणि पार्थ घुगे यांनी विविध वेशभूषेत प्रभावी अभिनयासह सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून देत संस्कृत भाषा आत्मसात करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अक्षरा व गुंजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्कृत शिक्षिका माधवी बडगुजर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्कृत विभागासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.