१ मेपासून स्वयं-गणना तर १६ मेपासून घर नोंदणी टप्प्याची सुरुवात; नागरिकांच्या सक्रिय सहभागावर भर
मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- देशातील अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या भारताच्या जनगणना २०२७ प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत होणारी ही जनगणना यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार असल्याने प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात येत आहे.
जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून स्वयं-गणना (Self-Enumeration) १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून, त्यानंतर १६ मे ते १५ जून २०२६ दरम्यान घर नोंदणी व गृहनिर्माण जनगणना (HLO) हा टप्पा पार पडणार आहे. यासाठी नागरिकांना “Census 2027-HLO” या विशेष मोबाईल अॅपसह स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या २३ डिसेंबर २०२५ रोजीच्या निर्णयानुसार राज्य यंत्रणेला या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील ‘त्रिमूर्ती प्रांगण’ परिसरात जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला असून, येथे जनगणना संदर्भातील बॅनर्सचे प्रदर्शन तसेच माहितीपर साहित्याद्वारे नागरिकांपर्यंत संदेश पोहोचविण्यात येत आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये जनगणनेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा आहे. मंत्रालयासारख्या प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अशा उपक्रमांच्या आयोजनामुळे जनगणनेविषयीची माहिती अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

