जीवाशी खेळ सुरूच; दुर्घटनेची वाट पाहतंय का प्रशासन ?मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील श्री संत मुक्ताई मंदिर नवीन परिसरातून सातोडकडे जाणाऱ्या मार्गावर महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यालगत उभारलेला विद्युत खांब तुटून एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे खांब धोकादायक स्थितीत असतानाही वीजपुरवठा सुरू असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, तुटलेल्या खांबाला तात्पुरत्या स्वरूपात लाकडी आधार देण्यात आला असून अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.घटनेनंतर बराच वेळ उलटूनही संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन धोकादायक खांब हटवून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

