बसस्थानक परिसरातील प्रकार; तीन ते चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिसांत तक्रार
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेकडून गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी शहरात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान बसस्थानक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या कारवाईला विरोध करत काही व्यक्तींनी अतिक्रमण निर्मूलन समितीचे अध्यक्ष कीर्तीकांत चौबे यांच्यासह नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने स्थापत्य अभियंता शुभम जाधव यांनी यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार तीन ते चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू असताना बसस्थानक परिसरात काही व्यक्तींनी विरोध दर्शविला. यावेळी संबंधित व्यक्तींनी समितीचे अध्यक्ष चौबे तसेच कारवाईसाठी उपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.या प्रकारानंतर नगरपरिषद प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्राप्त फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून, घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.