Wednesday, June 24, 2026
police dakshta logo
Homeजळगावनशिराबाद बायपास वरील एस.टी. बस चालक मनमानी प्रकरणी प्रशासनाची तात्पुरती हालचाल ;...

नशिराबाद बायपास वरील एस.टी. बस चालक मनमानी प्रकरणी प्रशासनाची तात्पुरती हालचाल ; उन्हात कर्मचारी उभे केल्याने नागरिकांत नाराजी

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील एस.टी. बससेवेच्या गंभीर प्रश्नाबाबत पोलीस दक्षताने दिलेल्या वृत्ताची प्रशासनाने तत्काळ दखल घेत गुरुवारी सकाळपासून नशिराबाद उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना एस.टी. महामंडळाचे दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या कर्मचाऱ्यांकडून उड्डाणपुलावरून वेगाने धावणाऱ्या बसांना नशिराबाद बायपास मार्गाने वळविण्याचे काम करण्यात आले. मात्र, कडक उन्हात कोणतीही सावली अथवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसताना कर्मचाऱ्यांना उभे केल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नशिराबाद येथे उड्डाणपूल झाल्यानंतर अनेक एस.टी. बस गावातील अधिकृत थांब्यावर न येता थेट बायपास मार्गाने धावत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. यामुळे विद्यार्थी, महिला, वृद्ध, रुग्ण तसेच कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काही बस चालक तर बसस्थानकावर “नशिराबाद थांबा नाही” असे सांगून प्रवाशांना बसमधून उतरवित असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

या गंभीर प्रश्नावर पोलीस दक्षताचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नेमले असले, तरी ही व्यवस्था कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीदेखील अशाच प्रकारे काही दिवस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, कर्मचारी हटताच पुन्हा बस चालकांची मनमानी सुरू झाल्याचा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला.तसेच नशिराबाद बस स्टॉपवरच जर एखादी छोटी कंट्रोल रूम देण्यात आली आणि तेथे एक कर्मचाऱ्याला बसविले तर नशिराबादला येणाऱ्या बस गाड्यांची नोंद तेथे करण्यात येईल व सर्व बसेस नशिराबाद बायपास रोडने कंट्रोल रूमला एन्ट्री करून पुढे जातील त्यामुळे कोणते वाहन कंट्रोल रूमला एंट्री न करता गेले हे कळेल. अशाही प्रकारच्या मागण्या नशिराबाद प्रवाशांकडून केल्या जात आहेत.नागरिकांच्या मते, एस.टी. महामंडळाने जळगाव व भुसावळ आगारातील चालकांना लेखी आदेश देऊन नशिराबाद बायपास मार्गे बस वळविण्याच्या स्पष्ट सूचना कराव्यात. आदेशाचे पालन न करणाऱ्या चालकांकडून दंड वसूल करावा, अशी मागणीही जोर धरत आहे.

दरम्यान, नशिराबाद बसस्टॉपवर दररोज शेकडो प्रवासी बसची प्रतीक्षा करत असतानाही अनेक बस न थांबता उड्डाणपुलावरून पुढे निघून जात असल्याने एस.टी. महामंडळाचाच आर्थिक तोटा होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. हे प्रकार जाणीवपूर्वक घडत असल्याचा आरोपही काही प्रवाशांकडून करण्यात येत आहे.खाजगी प्रवासी वाहतूक आणि एस.टी. महामंडळामध्ये काही संगनमत आहे का, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. तसेच जळगाव व भुसावळ आगारातून बस सुटताना बसस्थानकांवरील उद्घोषणेमध्ये “नशिराबाद थांबा उपलब्ध आहे” असे स्पष्टपणे सांगण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी, मजूर वर्ग व प्रवाशांकडून करण्यात आली आहे.नशिराबाद येथील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी एस.टी. महामंडळ व संबंधित प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या