Tuesday, June 9, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासंपूर्ण कर्जमाफीसह केळी उत्पादकांना मध्यप्रदेशप्रमाणे हेक्टरी २ लाखांची मदत द्या : डॉ.विवेक...

संपूर्ण कर्जमाफीसह केळी उत्पादकांना मध्यप्रदेशप्रमाणे हेक्टरी २ लाखांची मदत द्या : डॉ.विवेक सोनवणे

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसात सातत्याने होत असलेल्या वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने शेजारच्या मध्यप्रदेश प्रमाणे केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करत विनाअट संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करीत असून वाढता उत्पादन खर्च, रासायनिक खतांच्या गगनाला भिडलेल्या किमती, मजुरीतील वाढ आणि बाजारपेठेतील आर्थिक शोषण यामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. त्यातच मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरासह रावेर भागात ३१ मे ते ६ जून दरम्यान झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून त्याच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच केळी उत्पादकांना कोणत्याही अटी-शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याचीही मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.डॉ. विवेक सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला की, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांत भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदतीचे निकष वेगवेगळे का आहेत? मध्यप्रदेशात केळी पिकाचे ५५ टक्के पर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान ग्राह्य धरून हेक्टरी २ लाख रुपये मदत दिली जाते, तर महाराष्ट्रात केवळ २२ हजार ५०० रुपयांची मदत दिली जाते. हा महाराष्ट्रातील केळी उत्पादकांवर अन्याय असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये तीव्र होत आहे.

“आज एका केळीच्या खोडामागे किमान १०० रुपयांपेक्षा अधिक खर्च येत आहे. वाढती महागाई, मजुरी, खतांचा खर्च, बाजारपेठेतील लूट आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर केळी पिकाचे ५५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाख रुपये मदत जाहीर करून ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावी,” अशी मागणी डॉ. विवेक सोनवणे यांनी केली.तसेच, केळी उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्ती न लावता संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्यात यावी आणि कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशीही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे. अन्यथा आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमधील असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशाराही डॉ. विवेक सोनवणे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या