Tuesday, September 29, 2026
police dakshta logo
Homeजळगावराष्ट्रीय कराओके संमेलनाच्या सूत्रसंचालनाची धुरा जळगावच्या तुषार वाघुळदे यांच्याकडे; काश्मीरमध्ये घुमणार खान्देशचा...

राष्ट्रीय कराओके संमेलनाच्या सूत्रसंचालनाची धुरा जळगावच्या तुषार वाघुळदे यांच्याकडे; काश्मीरमध्ये घुमणार खान्देशचा आवाज!

महाराष्ट्र चित्रपट कलाकार असोसिएशनकडून प्रमुख निवेदक म्हणून निवड; २ ते ७ ऑक्टोबरदरम्यान उधमपूर येथे राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात २ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलनासाठी जळगाव येथील प्रसिद्ध निवेदक तथा कलावंत तुषार वाघुळदे यांची प्रमुख सूत्रसंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र चित्रपट कलाकार असोसिएशनने त्यांच्यावर या राष्ट्रीय संमेलनाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली असून, त्यांच्या निवडीमुळे खान्देशातील कला क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.देशाच्या विविध भागांतील कराओके गायक, गायिका, संगीतकार आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील शेकडो कलाकारांचा सहभाग अपेक्षित असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची प्रमुख निवेदक म्हणून निवड झाली आहे.वाघुळदे यांना सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली आणि विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रभावी आवाज, संवादकौशल्य आणि हजरजबाबी निवेदनशैलीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, इंदूर, भोपाळ, कोटा, विजयवाडा यांसह अनेक शहरांमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.

तुषार वाघुळदे यांनी यापूर्वी मराठी फिल्म्स चेंबर्स ऑफ कॉमर्स, कोल्हापूरचे सचिव तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये कार्यरत असून, प्रसिद्ध ‘ऑर्केस्ट्रा ७ स्ट्रिंग्स’ या संगीत समूहाचे संचालक आणि आयोजक म्हणूनही त्यांची ओळख आहे.
काश्मीरमधील राष्ट्रीय संमेलनाच्या सूत्रसंचालनाची संधी मिळाल्याबद्दल वाघुळदे यांनी आनंद व्यक्त केला. देशभरातील कलाकारांसमोर महाराष्ट्र आणि खान्देशचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाचे सूत्रसंचालन संस्मरणीय करण्यासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, या राष्ट्रीय संमेलनासाठी झालेल्या निवडीबद्दल संगीत, चित्रपट, सांस्कृतिक आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवार व हितचिंतकांकडून तुषार वाघुळदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या आगामी काश्मीर दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या