११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात; शासनाच्या विविध कृषी योजनांची दिली माहिती
नशिराबाद | प्रतिनिधी : नशिराबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन किरण भोजराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फ्रूट सेल सोसायटीच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेच्या पटलावरील सर्व विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली.याप्रसंगी संस्थेचे संचालक पंकज महाजन यांची प्रभारी नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने नगरसेवक लालचंद पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक सभा संपल्यानंतर तरुण शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये पशुपालन, शीतगृह (कोल्ड स्टोरेज), गोदाम (वेअर हाऊस), ट्रॅक्टर व आधुनिक शेती अवजारे यांसह विविध योजनांची तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्याची सविस्तर माहिती देण्यात आली. यासाठी जिल्हा कृषी विभाग, जळगाव येथील जिल्हा संसाधन व्यक्ती समाधान पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तरुण शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांनी विविध योजनांसंदर्भात उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही त्यांनी केले.या सभेस संस्थेचे सर्व संचालक, सभासद, तरुण शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रशांत भंगाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद रंधे यांनी केले.