मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील हवामानात लवकरच बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून 17 ते 20 मार्च या कालावधीत काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विशेषतः दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
सध्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये या बदलत्या हवामानाचा परिणाम जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान वातावरणातील अस्थिरता वाढण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाबरोबर गारपीट होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढणी केलेली पिके मोकळ्या जागेत न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्री आदींच्या साहाय्याने झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच संभाव्य वादळी वारे, पाऊस आणि गारपीटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

