नशिराबाद नगरपरिषदेकडून शहरातील धोकादायक व जीर्ण बांधकामांवर विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेत संबंधित शाळा इमारतीचाही समावेश करून जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधत तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील सुनसगाव रस्त्यावरील खंडेराव मंदिरासमोरील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेची जीर्ण व मोडकळीस आलेली इमारत नागरिकांसाठी गंभीर धोका ठरत असून, ही इमारत तातडीने पाडण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा प्रस्ताव व अहवाल पाठवूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
- जिल्हा परिषदेच्या अधिनस्त मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांच्या निर्लेखनाबाबत शासन निर्णय क्र. जिपशा-२०२५/प्र.क्र.८३/१२४७०५०/आस्था-१५ या परिपत्रकान्वये क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तसेच विविध योजनांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या जीर्ण इमारती पाडण्याबाबत ९ जानेवारी २०१२ व ८ जून २०१२ च्या शासन परिपत्रकात सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ठराव क्र. ६९० नुसार शिक्षण व क्रीडा समितीच्या शिफारशीवरून एरंडोल, भडगाव, पारोळा, चोपडा व जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील जीर्ण वर्गखोल्यांच्या निर्लेखनास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये जि.प. प्राथमिक केंद्रशाळा नशिराबाद येथील तीन वर्गखोल्या पाडण्याचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन वेळा गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे संबंधित इमारत पाडण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. संबंधित इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून याच इमारती समोरील भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरीदेखील प्रशासनाकडून आवश्यक ती दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या जीर्ण इमारतीचा धोका अधिक वाढला आहे. नगरपरिषद नशिराबादकडून शहरातील धोकादायक व जीर्ण बांधकामांवर विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेत संबंधित शाळा इमारतीचाही समावेश करून जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दर शुक्रवारी या परिसरात आठवडे बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. अनेक विक्रेते या इमारतीलगत बसत असतात. तसेच परिसरात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सतत वर्दळ सुरू असते. शेजारीच मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून जीर्ण इमारत तातडीने पाडावी, अन्यथा होणाऱ्या संभाव्य अनर्थास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


