मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत गृह विभागाने पोलीस उपअधीक्षक (DYSP) आणि समकक्ष दर्जाच्या तब्बल ११५ अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.सोमवारी गृह विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्हे, पोलीस आयुक्तालये, विशेष शाखा तसेच प्रशिक्षण केंद्रांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली असून, काहींना विद्यमान पदावरच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

बदली झालेले अधिकारी व त्यांचे नव्या ठिकाणी झालेल्या बदल्यांचे ठिकाण..
नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जाधव यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. तर नागपूर शहरातील सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांची नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर उपविभागाचे अधिकारी विकास नाईक यांची नागपूर येथे बदली झाली आहे.
नागपूर ग्रामीणमधील रामटेक उपविभागाचे अधिकारी रमेश बरकते यांची भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांची पुणे शहरात नियुक्ती झाली असून नाशिक येथील एटीएसचे अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांची नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
ठाणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांची यवतमाळ येथे, तर मीरा-भाईंदर वसई-विरार येथील उमेश माने (पाटील) यांची सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरातील मंदार जावळे यांची परिवहन विभागाच्या दक्षता शाखेत बदली झाली आहे.
पिंपरी-चिंचवडचे विशाल हिरे यांची नवी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड उपविभागाचे अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांची सीआयडीमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सातारा शहर उपविभागाचे अधिकारी राजीव नवले यांची पुणे सीआयडीमध्ये बदली करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीणमधील कळवण उपविभागाचे अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणमधील संतोष गायकवाड यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. सोलापूर ग्रामीणमधील विलास यामावार यांची पुणे सीआयडीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर वसई-विरारचे बजरंग देसाई यांची नवी मुंबईत बदली करण्यात आली असून पुणे शहरातील नंदिनी वग्यानी यांची अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. दौंड पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सई भोरे-पाटील यांची पुणे येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीत बदली झाली आहे.
पुणे ग्रामीणमधील प्रशांत ढोले यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. गडचिरोलीतील जगदीश पांडे यांची अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली असून ठाणे ग्रामीणमधील मिलिंद शिंदे यांची ठाणे शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला प्रशिक्षण केंद्रातील पूनम पाटील यांची नाशिक शहरात बदली झाली आहे. धाराशिवचे निलेश देशमुख आणि ठाणे शहरातील प्रिया डमाळे यांची पिंपरी-चिंचवड येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे सीआयडीमधील तृप्ती जाधव यांची धाराशिव जिल्हा जात पडताळणी समितीत बदली करण्यात आली आहे.
नांदेडमधील संकेत गोसावी यांची पुणे सीआयडीमध्ये नियुक्ती झाली असून सांगलीच्या प्रणिल गिल्डा यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरमधील सुजीतकुमार क्षीरसागर यांची अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीणमधील सुदर्शन राठोड यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली झाली आहे. सोलापूर ग्रामीणचे संकेत देवळेकर यांची परभणी शहरात नियुक्ती करण्यात आली आहे. गोंदियातील साहील झरकर यांची चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे बदली झाली आहे.
गोंदियातील प्रमोद मडामे यांची नागपूर ग्रामीणमध्ये नियुक्ती झाली आहे. गडचिरोलीतील चैतन्य कदम यांची बारामती येथे नियुक्ती झाली असून सांगलीतील विपुल पाटील यांची बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे.गडचिरोलीतील रविंद्र भोसले यांची पुणे ग्रामीणमधील शिरूर उपविभागात नियुक्ती झाली आहे. परभणीतील समाधान पाटील यांची गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे बदली झाली आहे. गोंदियातील विवेक पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
गडचिरोली मुख्यालयातील योगेश रांजणकर, गोंदियातील रोहिणी बाणकर आणि बुलढाण्यातील मनीषा कदम यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.गडचिरोलीतील अजय कोकाटे यांची नवी मुंबई येथे बदली झाली असून विशाल नागरगोजे यांची ठाणे ग्रामीणमधील शहापूर येथे नियुक्ती झाली आहे. सिरोंचा उपविभागातील संदेश नाईक यांची सांगली जिल्ह्यातील मिरज येथे बदली करण्यात आली आहे.
यवतमाळ येथील दिनेश बैसाने यांची पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे नियुक्ती झाली आहे. गडचिरोलीतील सूरज जगताप यांची सोलापूर ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील अंकिता कणसे यांची ठाणे जिल्हा जात पडताळणी समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीतील वसंत कुंवर, नागपूर शहरातील अनिता मोरे तसेच राज्य गुप्तवार्ता विभागातील स्वप्ना बोधके यांची पुणे शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय गडहिंग्लज येथील रामदास इंगवले यांची पुणे शहरात बदली करण्यात आली आहे. यवतमाळच्या उमरखेड उपविभागातील हनुमंत गायकवाड यांची नंदुरबार येथे नियुक्ती झाली असून छत्रपती संभाजीनगर येथील दत्तात्रय थोपटे यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, शेखर देशमुख, सचिन सांगळे, गजानन राठोड, शशीकिरण काशीद, सचिन बारी, संदीप मिटके, मयूर भुजबळ, बाजीराव महाजन, राहुल झालटे आणि पूजा नंगरे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदावरच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


