नागपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्य शासनाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय जाहीर करत नागपूर शहराच्या नवीन पोलीस आयुक्तपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.

राज्य पोलिस दलातील धडाडीचे आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळख असलेले विश्वास नांगरे पाटील यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आपली वेगळी कार्यशैली सिद्ध केली आहे. १९९७ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नांगरे पाटील यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, मुंबई पोलिस दलातील उपायुक्त, नाशिकचे पोलीस आयुक्त तसेच मुंबईतील कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे. अलीकडे ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते.२००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेल परिसरात दाखवलेल्या धाडसी भूमिकेमुळे विश्वास नांगरे पाटील यांना देशभरात विशेष प्रसिद्धी मिळाली होती. संकटाच्या काळात शांतपणे आणि ठामपणे काम करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते युवकांमध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जातात.नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर असल्याने येथे कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच व्हीआयपी सुरक्षा, मोठे राजकीय कार्यक्रम आणि संवेदनशील परिस्थिती हाताळण्याची मोठी जबाबदारी असते. शहरात वाढणारे सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, वाहतूक समस्या आणि संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी नव्या पोलीस आयुक्तांकडून प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विश्वास नांगरे पाटील यांच्या नियुक्तीचे विविध सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग तसेच युवकांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलिस दल अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

