जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव पंचायत समितीत विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मिलिंद चौधरी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस गिरीश वराडे, रामचंद्र पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष निवृत्ती पाटील, भाजपा आयटी सेल जिल्हाध्यक्ष वासुदेव कोळी, अभियंता शिसोदे, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बबन आप्पा वाघ तसेच ॲडिशनल गटविकास अधिकारी योगिता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करून हप्ते लवकर वितरित करण्याचे कडक निर्देश खासदार वाघ यांनी दिले. “शासनाच्या योजना वेळेत पोहोचल्या नाहीत, तर त्याचा सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, सेस फंडांतर्गत कामे, वित्त आयोग निधीतील विकासकामे, सिंचन विहीर व गाय-गोठा अनुदान योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवाव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.“योजनांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत,” असे सांगत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून कामात हलगर्जीपणा आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, महिला बचत गटांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देत ग्रामीण महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनविण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देशही देण्यात आले. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रदर्शन, मेळावे, विक्री केंद्रे तसेच ई-कॉमर्स माध्यमांचा वापर वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.तसेच महिला गटांना व्यवसाय कौशल्य, पॅकेजिंग, ब्रँडिंग व मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्याबरोबरच बँकिंग सुविधा, कर्ज योजना व अनुदानांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.“ग्रामीण भागातील प्रत्येक महिला ही संभाव्य उद्योजक आहे. योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास त्या संपूर्ण कुटुंब आणि गावाच्या आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावू शकतात,” असे मत खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केले.
या बैठकीमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरच त्याचा प्रत्यक्ष लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

