जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शेतकऱ्यांच्या विहिरी व बोरवेलवरील मोटारींच्या तांब्याच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एमआयडीसी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला सुमारे ८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ३० मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारास फिर्यादी नवल भटू गुंजाळ (वय ३१, रा. लमांजन, ता. जि. जळगाव) यांच्या तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व बोरवेलवरील मोटारींना जोडलेल्या तांब्याच्या वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी अनिल कर्तार भिल्ल, संदीप सुभाष देवरे (रा. नागली, ता. एरंडोल) व आनंदा शांताराम कोळी (रा. वाकडी, ता. जि. जळगाव) यांना ३१ मार्च रोजी शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.आरोपींकडून सुमारे ५ किलो वजनाचे जाळून काढलेले तांबे व इतर साहित्य असा एकूण ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पो.हे.कॉ. ईश्वर लोखंडे, समाधान टहाकळे, किरण पाटील, कैलास पाटील व राहुल बोरसे यांनी केली.

