मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्याच्या महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर मोठा निर्णय घेत ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare यांनी दिली.
विभागातील एकूण पदांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर काही पदे निरसित (रद्द) करण्यात आली असून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदांची संरचना निश्चित करण्यात आली आहे.याशिवाय, विभागाच्या दैनंदिन कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, एकात्मिक बाल विकास सेवा अर्थात Integrated Child Development Services (ICDS) योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर मानधनाधारित पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका आणि तेवढ्याच म्हणजे १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण २ लाख २१ हजार ३२८ पदांचा समावेश आहे.दीर्घ काळानंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय महिला व बालकल्याण क्षेत्रासाठी निर्णायक ठरणार असून, विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि गतिमान होईल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

