समता, बंधुत्व व स्वाभिमानाच्या विचारांना उजाळा; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
वैजापूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वैजापूर येथे भव्य रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. परमविरचक्र विजेते शहीद अब्दुल हमीद एकता असोसिएशन व राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल रोजी जेतवन बुद्धविहार, लाडगाव रोड येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. वैजापूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. दिनेशभाऊ परदेशी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी, “डॉ. आंबेडकर यांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून वर्तमान व भविष्य घडवणारी प्रेरणा आहेत. समता, न्याय, बंधुत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प समाजाने करावा,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक रियाजखान पठाण यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. शेरूभाई मोमीन यांनी केले. या उपक्रमातून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि समतेचा संदेश समाजात दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

