Saturday, April 18, 2026
police dakshta logo
Homeक्राईम‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून लाखोंची लूट; जळगावातील चौघे जाळ्यात

‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून लाखोंची लूट; जळगावातील चौघे जाळ्यात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुंबईतील एका महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली घाबरवून मोठी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई सायबर क्राइम शाखेने धडक कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून त्यापैकी २५ लाख रुपये रोख स्वरूपात आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत.सायबर क्राइम विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने नशिराबाद परिसरात कारवाई केली. तपासादरम्यान जयेश काळे (रा. तरसोद) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार संकेत महाजन आणि यशवंत धांडे या दोघांना मेहरुण परिसरातून अटक करण्यात आली.

तपासात उघडकीस आले की, आरोपींनी मुख्य सूत्रधाराच्या सूचनेनुसार मुंबईतील फिर्यादी महिलेच्या घरी प्रत्यक्ष जाऊन सुमारे २५ लाख रुपये रोख रक्कम घेतली होती. ही रक्कम नंतर जळगावमध्ये आणून विनोद अत्तरदे (रा. खेडी) याच्या ताब्यात दिली गेली. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.या कारवाईत पोलिसांनी २५ लाखांची रोकड जप्त केली असून उर्वरित रक्कम इतर मार्गांनी लपविल्याचा संशय आहे. तसेच मुख्य आरोपीकडून दीड लाख रुपये आणि सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.प्राथमिक चौकशीत मुख्य आरोपी यापूर्वी परदेशात, विशेषतः कंबोडिया येथे काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे.या गुन्ह्यात ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून पीडितेला मानसिक दबावाखाली ठेवत पैसे उकळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

अटक केलेल्या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यात हलविण्यात आले असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. आर्थिक व्यवहारांची साखळी, मोबाईल संपर्क आणि डिजिटल पुरावे तपासून या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे.दरम्यान, अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीचे जाळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अनोळखी फोन कॉल, धमक्या किंवा ऑनलाईन व्यवहारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या