पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तत्परता दाखवत दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघडकीस आणत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नय्युम जहांगिर देशमुख (रा. आक्सानगर, जारगाव ता. पाचोरा) यांच्या इलेक्ट्रिक दुकानाच्या गोडाऊनमधून ९४,५०० रुपये किंमतीचे गोदरेज कंपनीचे तीन ए.सी. अज्ञात चोरट्यांनी १ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान चोरून नेले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे रिहान हमीश शहा (वय २२, रा. हनुमाननगर, पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आले.चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले तीन ए.सी. हस्तगत करण्यात आले. याशिवाय गुन्हा रजिस्टर क्रमांक १७४/२०२६ मधील ३० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या पोत चोरी प्रकरणाचाही उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
या दोन्ही गुन्ह्यांतील संपूर्ण मुद्देमाल अल्पावधीत हस्तगत केल्यामुळे संबंधित फिर्यादी तसेच नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत झाली आहे.

