तीन दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा सुरू झाल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शोकॉज नोटीस बजावली आहे. या प्रकरणात तीन दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून शिक्षण विभागात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय कार्यालयाची वेळ सकाळी साडेनऊ वाजताची असतानाही संबंधित कार्यालय सुमारे साडेअकरा वाजेपर्यंत बंदच होते. यामुळे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत कारवाईच्या सूचना दिल्या.त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी तातडीने हालचाल करत गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांना शोकॉज नोटीस बजावली. कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणे, कामकाजातील नियोजनाचा अभाव तसेच प्रशासकीय अकार्यक्षमता या मुद्द्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, तालुक्यातील काही शिक्षकांकडूनही संबंधित अधिकाऱ्यांविरोधात विविध तक्रारी केल्या गेल्याची चर्चा असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. नागरिकांच्या सेवेत होणारा विलंब टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

