सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा दिला संदेश
मेहरूण | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सेवा संकल्प अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून झाडाची प्रतिकृती साकारत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश दिला.विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमाची भावना रुजावी, तसेच वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने विद्यालयाच्या इको क्लबतर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवी रांगोळीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.विद्यालयाच्या इको क्लबतर्फे पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि वृक्षांचे संगोपन याबाबत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षांचे जतन करण्याचा संकल्प केला.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक, पर्यवेक्षिका शितल कोळी, शिक्षकवृंद तसेच इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.