विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग; गणरायाला ११०० मोदकांचा नैवेद्य
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व कौशल्यविकासात्मक उपक्रमांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उत्सवाच्या सांगतेप्रसंगी विद्यार्थ्यांनी आणलेल्या तब्बल ११०० मोदकांचा गणरायाला नैवेद्य अर्पण करून भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.गणेशोत्सवानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या विद्यार्थी बालमंडळाच्या अध्यक्षपदी चित्राक्षी चौधरी, उपाध्यक्षपदी ज्ञानिका पाटील, खजिनदारपदी ज्ञानदा चौधरी, सचिवपदी गितेश चव्हाण, तर सहसचिवपदी स्वराज भावसार यांची निवड करण्यात आली. सहसचिव स्वराज भावसार यांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.उत्सवाच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इंग्रजी स्पेलिंग स्पर्धेसाठी एकूण १२ गट तयार करण्यात आले होते. यामध्ये गट क्रमांक चारमधील मृणाल चौधरी व डिंपल रोटे, तसेच गट क्रमांक आठमधील चित्राक्षी चौधरी व चैताली पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला. गट क्रमांक आठमधील देवेंद्र भोई व रुद्र चौधरी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. गीतगायन स्पर्धेत करण महाजन प्रथम, देवेंद्र भोई द्वितीय, तर गितेश चव्हाण तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. मोदक बनविण्याच्या स्पर्धेत इयत्ता तिसरीतील यश पाटील, जिग्नेश मराठे व निशा चौधरी, तसेच चौथीतील चित्राक्षी चौधरी, पूर्वजा नारखेडे व स्वराज भावसार यांनी विजेतेपद मिळविले.
उत्सवाच्या सांगतेप्रसंगी रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व भक्तिगीतांच्या साथीने गणरायाची विसर्जन मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांनी श्री गणेशाची आरती करून भावपूर्ण निरोप दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या ११०० मोदकांचा गणरायाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.या सोहळ्यास नशिराबादचे नगराध्यक्ष तथा नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी, उपाध्यक्ष विनायक वाणी, संचालक ॲड. प्रदीप देशपांडे, जितेंद्र महाजन, केंद्रप्रमुख राहुल संसारे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रवीण महाजन, माध्यमिक उपमुख्याध्यापक अनिल चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाचपांडे यांच्यासह शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकता, बंधुभाव, शिस्त, सर्जनशीलता व सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन स्वाती रोटे, दीपमाला सपकाळे, संगीता जोशी व जयश्री चौधरी यांनी केले. मुख्याध्यापक प्रवीण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. अखेर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.