भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ जवळील कुऱ्हे पानाचे शिवारात प्रा. डॉ. दिलीप ललवाणी यांनी साकारलेल्या ‘ललवाणी ॲग्रो टुरिझम’ व ‘मन-जिया रेस्टॉरंट’सह विविध प्रकल्पांचे उद्घाटन वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, माजी आमदार मनीष जैन, उद्योजक राधेश्याम लाहोटी, शिक्षणतज्ज्ञ संजय गरुड, माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी व अॅड. अकील इस्माईल यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री सावकारे यांनी ललवाणी ॲग्रो टुरिझम हे भुसावळ, जामनेर, जळगाव व बोदवड या भागांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांसाठी एक उत्कृष्ट मनोरंजन केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. येथे राबविण्यात येणाऱ्या नवनवीन संकल्पनांचे त्यांनी कौतुक केले.नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी या प्रकल्पास शुभेच्छा देत, येथे प्रवेश करताच अनुभवलेले निसर्गरम्य व आल्हाददायक वातावरण विशेष भावल्याचे सांगितले. माजी आमदार मनीष जैन यांनी ललवाणी परिवाराच्या कार्याचे कौतुक करत प्रा. डॉ. ललवाणी यांच्या अथक परिश्रमाचे हे यश असल्याचे नमूद केले.माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी प्रा. ललवाणी यांनी संघर्षातून उभारलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.संजय गरुड यांनी त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याला सलाम केला. राधेश्याम लाहोटी यांनी ललवाणी हे निवृत्तीनंतरही नव्या जोमाने कार्यरत असून गोसेवा व गोशाळा उभारणीसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. अॅड. अकील इस्माईल यांनी ललवाणी यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे वर्णन करत माणुसकी व आपुलकी हीच त्यांची खरी संपत्ती असल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण परिसर निसर्गमय सजविण्यात आला होता. प्रमुख पाहुण्यांचे बैलगाडीतून स्वागत करण्यात आले, तसेच सनई-चौघड्यांच्या निनादात वातावरण भारावून गेले. परिसरातील भुसावळ, जामनेर व जळगाव येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात गणेश आरती व नवकार मंत्राने झाली. सूत्रसंचालन दिपाली सोनार यांनी प्रभावी शैलीत केले. कार्यक्रमानंतर खानदेशी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यात आला. स्वच्छता, निसर्गरम्य वातावरण, निवास व्यवस्था, रेन डान्स, बांबू हाऊस आदी सुविधांमुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शेवटी हास्यकलाकार भाऊ कदम यांच्या विनोदी सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली.

