रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून सेवापुस्तक पळताळणीच्या प्रक्रियेभोवती संशयाचे वातावरण तयार झाले आहे. साधारणपणे सेवापुस्तक तपासणी ही ठराविक कारणांकरिता—प्रमोशन, वेतनश्रेणी निश्चिती किंवा सेवानिवृत्तीपूर्व कालावधीत—केली जाते. मात्र, रावेर तालुक्यात कोणतेही स्पष्ट कारण नसताना मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची सेवापुस्तके तपासणीसाठी मागवली जात असल्याची चर्चा रंगली आहे.गेल्या काही महिन्यांपासून अचानक वाढलेल्या या तपासणीमुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत काही बाहेरील व्यक्तींचा सहभाग असल्याचेही बोलले जात असून, अधिकृत यंत्रणेला वगळून वेगळीच व्यवस्था कार्यरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
यामध्ये काही शिक्षकांना अनपेक्षित कॉल्स येणे, सेवापुस्तकांबाबत तातडीची कार्यवाही सांगितली जाणे, तसेच गोपनीय कागदपत्रे नियमित पद्धतीऐवजी वेगळ्याच मार्गाने हाताळली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे या सर्व प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या घडामोडींमुळे शिक्षण विभागात नेमके काय सुरू आहे? कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या उद्देशाने ही हालचाल सुरू आहे? या प्रश्नांची उत्तरे अद्यापही स्पष्ट झालेली नाहीत. मात्र, या प्रकरणामागे काहीतरी मोठा आर्थिक व्यवहार दडलेला असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
(पोलीस दक्षता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणाचा पुढील भागात म्हणजेच भाग 2 मध्ये अधिक धक्कादायक खुलासा करणार आहे…) क्रमशः

