जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जळगाव शहर वाहतूक शाखेकडून कडक कारवाई करण्यात येत असून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर व अवैध फॅन्सी नंबर प्लेटविरुद्ध मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. तपासणीदरम्यान १०० दुचाकींवर बसविण्यात आलेले सायलेन्सर हे संबंधित कंपनीकडून न बसविता नंतर बाहेरून बसविलेले असल्याचे आढळून आले. या सायलेन्सरमुळे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने पोलीसांनी ते जप्त केले होते.
यासोबतच शहरात अवैधरित्या फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई करत सुमारे २५० नंबर प्लेट ताब्यात घेण्यात आल्या. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेले सायलेन्सर व नंबर प्लेट रोड रोलरच्या सहाय्याने चिरडून निकामी करण्यात आले.दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.सन २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण ९३९ अपघातांची नोंद झाली असून त्यापैकी ४५० अपघात प्राणघातक ठरले.या अपघातांमध्ये सुमारे ४८७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर प्रमुख रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. विना हेल्मेट वाहन चालविणे, तिघे बसून प्रवास (ट्रीपल सीट), अल्पवयीन चालक, बेफिकीर व वेगाने वाहन चालविणे, नो-पार्किंगचे उल्लंघन, अवैध प्रवासी वाहतूक, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, राँग साईडने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर तसेच कर्कश सायलेन्सर अशा विविध नियमभंगांवर कठोर कारवाई केली जात आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच ‘शून्य प्राणहानी’ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्हा स्तरावर रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून जनजागृती व कारवाईच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

