जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अंगारकी चतुर्थीच्या पावन निमित्ताने पद्मालय येथील श्री गणपती मंदिरात काल पहाटे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक, विधिवत पूजा व आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पहाटे ४ वाजता पार पडलेल्या या धार्मिक विधींमुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन व जागृत स्थान मानले जाते. विशेष म्हणजे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर असून, संकष्टी व अंगारकी चतुर्थीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात.पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणावरून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पहाटे मंदिरात उपस्थित राहून विधिवत पूजा व आरती केली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी पुजारी गणेश वैद्य व केशवराव पुराणिक यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पूजेचे विधी संपन्न करून घेतले.पूजनानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंदिराचा इतिहास तसेच सुरू असलेल्या विकासकामांची माहिती जाणून घेतली. यावेळी श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय ट्रस्टतर्फे त्यांचा शाल व गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे, राजेश तिवारी, अर्जुन पाटील, शिरीष बर्वे यांच्यासह तहसीलदार गोपाल पाटील, जैन इरिगेशनचे अनिल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.देवस्थानचे सहकारी अशोक पाटील व जोशी यांनी पूजेचे नियोजन केले.दरम्यान, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानतर्फे सावलीसाठी मंडप, कुलर तसेच थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अंगारकी चतुर्थी निमित्त पद्मालय येथे होणारा हा धार्मिक सोहळा भाविकांसाठी विशेष श्रद्धेचा मानला जातो.

