Saturday, May 23, 2026
police dakshta logo
Homeजळगावबोदवड हत्या प्रकरणानंतर मोठी कारवाई: हलगर्जीपणाचा ठपका; एपीआयसह तिघे निलंबित

बोदवड हत्या प्रकरणानंतर मोठी कारवाई: हलगर्जीपणाचा ठपका; एपीआयसह तिघे निलंबित

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- बोदवड तालुक्यात घडलेल्या हत्या प्रकरणानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत बोदवड पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर, एएसआय रविंद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. विभागीय चौकशीत या तिघांकडून कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, दोन गटांमधील सुरू असलेला वाद दिवसेंदिवस तीव्र होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना आधीपासून होती. परिस्थिती चिघळण्याची शक्यता स्पष्ट असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलली नसल्याचे चौकशीत निदर्शनास आले. परिणामी हा वाद विकोपाला जाऊन अखेर हत्या घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे दोन्ही गटांवर प्रतिबंधात्मक कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी प्रकरण गांभीर्याने न हाताळता आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.तसेच टाऊन बीट प्रभारी एएसआय रविंद्र गुरचळ यांनीही वादानंतर घटनास्थळी भेट देऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधितांना पोलीस ठाण्यात आणून योग्य ती कारवाई करण्याऐवजी त्यांना समज देऊन सोडण्यात आल्याने पुढील गंभीर घटना टाळण्याची संधी दवडल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांना वादाची माहिती फोन व व्हॉट्सअॅपद्वारे देण्यात आली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील परिस्थिती संवेदनशील असल्याचे सांगितले होते. तरीही त्यांनी तातडीने हस्तक्षेप न करता वरिष्ठांना वेळेत माहिती दिली नसल्याचे चौकशीत उघड झाले.या तिघांच्या निष्क्रियतेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम झाला असून अखेर गंभीर गुन्हा घडल्याचा निष्कर्ष विभागीय चौकशी अहवालात नोंदविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पुढील विभागीय चौकशी सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या