जळगाव |प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल देण्यासाठी लाच स्वीकारताना पकडलेल्या सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत भुसावळ येथील बँक लॉकरवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तूंसह तब्बल १ कोटी ७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेमुळे शासकीय विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अवैध सावकारी संदर्भातील कारवाईत तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल होऊ नये तसेच संबंधित प्रकरणात अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बारी आणि त्यांचा खासगी सहकारी देविदास पाटील यांनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप होता. तडजोडीनंतर तीन लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये स्वीकारताना ACB च्या पथकाने दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर अधिक तपास करताना अधिकाऱ्यांना बारी यांच्या भुसावळ येथील बँक लॉकरची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला असता लॉकरमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये सुमारे ६६० ग्रॅम सोन्याचे दागिने, १० किलो ५०० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच ८ लाखांहून अधिक रोकड रक्कमेचा समावेश आहे.
ACB ने जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत १ कोटी ७ लाख ४४ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. दरम्यान, आरोपी उपनिबंधकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणातील आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि अन्य गुंतवणुकींचीही चौकशी सुरू असून ACB चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.

