Saturday, May 23, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनाशिराबाद शहरासाठी गॅस रिफिल बुकिंगचा शहरी निकष लागू करण्याची मागणी

नाशिराबाद शहरासाठी गॅस रिफिल बुकिंगचा शहरी निकष लागू करण्याची मागणी

उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नाशिराबाद नगरपरिषद स्थापन होऊन जवळपास सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून गावाचा समावेश ग्रामीण भागातून शहरी भागात करण्यात आला आहे. मात्र आजही घरगुती गॅस रिफिल बुकिंगसाठी ग्रामीण भागाचा निकष लागू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.याबाबत नाशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे निवेदन सादर करून शहरी भागासाठी लागू असलेला २५ दिवसांचा गॅस रिफिल बुकिंग निकष नाशिराबाद शहरासाठी लागू करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारत सरकारच्या गॅस वितरण प्रणालीमध्ये ग्रामीण भागासाठी सिलेंडर रिफिल बुकिंगची मर्यादा ४५ दिवसांची ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरी भागासाठी ही मर्यादा २५ दिवसांची आहे. नाशिराबाद नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतरही नागरिकांना ग्रामीण निकषांनुसारच सेवा दिली जात असल्याने शहरातील ग्राहकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागत आहे. नाशिराबादमधील नागरिकांना शहरी भागाप्रमाणे सुविधा मिळाव्यात, तसेच गॅस रिफिलसाठी २५ दिवसांची मर्यादा लागू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर भूषण कोल्हे, संदीप पाटील, रवींद्र चौधरी, निवृत्ती कोल्हे, राहुल चौधरी, वैभव गोसावी यांच्या सह्या आहेत.

तसेच भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इतर गॅस वितरण कंपन्यांनी नाशिराबाद शहराची नोंद शहरी भाग म्हणून करून त्यानुसार आदेश निर्गमित करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या