Saturday, June 6, 2026
police dakshta logo
Homeअपघातलस्सी पिण्याचा बेत ठरला अखेरचा प्रवास; वरणगावजवळ भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

लस्सी पिण्याचा बेत ठरला अखेरचा प्रवास; वरणगावजवळ भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- वरणगाव परिसरात भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत एका दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये एका महिलेसह अवघ्या एक वर्षांच्या बालिकेचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील आदिवासी पारधी समाजातील एकाच कुटुंबातील सदस्य दुचाकीवरून बाहेर गेले होते. लस्सी पिण्यासाठी निघालेल्या या कुटुंबाच्या प्रवासाला वरणगावजवळ अचानक दुर्दैवी वळण मिळाले. भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचे मोठे नुकसान झाले.या भीषण अपघातात विजय शंकर काळे (वय 19), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय 30), विघ्नेश शंकर चव्हाण (वय 14) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय 1) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले. रुग्णालयात पोहोचलेल्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडल्याने वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.

दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या स्कॉर्पिओचा चालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या