Saturday, June 6, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजामनेरमध्ये प्रतिबंधित कापूस बियाण्यांवर धाड; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांवर गुन्हा

जामनेरमध्ये प्रतिबंधित कापूस बियाण्यांवर धाड; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांवर गुन्हा

जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांच्या अवैध साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान जामनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा संशयित बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात चार जणांविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जामनेर शहरातील साईनाथ नगर परिसरातील एका घरात प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा मोठा साठा ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.झडतीदरम्यान घरातील एका खोलीत मोठ्या प्रमाणावर कापूस बियाण्यांची पाकिटे आढळून आली.तपासणीमध्ये एकूण १ हजार १६ पाकिटांचा साठा जप्त करण्यात आला. या बियाण्यांची अंदाजे किंमत ९ लाख १५ हजार ४१६ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विविध ब्रँडच्या कापूस बियाण्यांचा समावेश असून त्यासंदर्भातील आवश्यक परवाने, खरेदी-विक्रीची कागदपत्रे अथवा अधिकृत नोंदी उपलब्ध नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा साठा जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार संबंधित व्यक्तींची नावे निष्पन्न झाल्यानंतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी बियाणे निरीक्षकांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.दरम्यान, जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर बियाण्यांच्या विक्रीस आळा घालण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेते व प्रमाणित कंपन्यांचीच उत्पादने घ्यावीत, तसेच संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ तसेच पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या