जळगावातील अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठे यश
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) जळगाव व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) या घातक अंमली पदार्थासह एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना काही व्यक्ती एम.डी. (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.त्यानुसार ४ जून २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सुरेशदादा जैन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील परिसरात पोलिसांनी सापळा रचला.या ठिकाणी उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी एस-क्रॉस (एमएच-२९-बीसी-५१००) कारमध्ये तीन संशयित आढळून आले. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेला एम.डी. अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. घटनास्थळी उपस्थित फॉरेन्सिक पथकाने प्राथमिक तपासणी करून सदर पदार्थ मेफेड्रोन असल्याची पुष्टी केली.
या कारवाईत रईस हारुन देशमुख (वय २७, रा. एमआयडीसी पोलीस कॉलनी, जळगाव), तौसिफ सैय्यद आरिफ (वय २१, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि कृणाल ऊर्फ लकी रमेश पाटील (वय ३०, रा. देविदास कॉलनी, जळगाव) यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी हा अंमली पदार्थ इतर एका साथीदाराकडून खरेदी केल्याची माहिती दिल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत.पोलिसांनी आरोपींकडून १६.११ ग्रॅम वजनाचा सुमारे ४८ हजार रुपये किंमतीचा एम.डी. अंमली पदार्थ, ४ लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी एस-क्रॉस कार, ५० हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, ७५ हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर मोटारसायकल तसेच ८० हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल मुरलीधर धनगर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे सांगत नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व प्रोबेशनरी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

