Friday, June 5, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासाई आश्रम प्रसादालयात सापडलेली मोबाईल व रोकड असलेली बॅग भाविकास परत; सुरक्षा...

साई आश्रम प्रसादालयात सापडलेली मोबाईल व रोकड असलेली बॅग भाविकास परत; सुरक्षा रक्षकांच्या प्रामाणिकतेचे कौतुक

शिर्डी | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकतेमुळे हरवलेली मोबाईल व रोख रक्कम असलेली बॅग संबंधित साईभक्ताला सुरक्षितपणे परत मिळाली. या घटनेमुळे संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेवरील भाविकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिनांक ३ जून २०२६ रोजी साई आश्रम प्रसादालय परिसरात नियमित गस्तीदरम्यान सुरक्षा रक्षक सोमनाथ कसबे यांना एक बेवारस बॅग आढळून आली. बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन व ११ हजार ७५० रुपयांची रोख रक्कम आढळली. मौल्यवान वस्तू व रोकड असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ सदर बॅग संरक्षण कार्यालयात जमा केली.संरक्षण कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या चौकशीत ही बॅग झारखंड येथील साईभक्त अमरजीत कुमार भारती यांची असल्याचे निष्पन्न झाले. आवश्यक पडताळणीनंतर मोबाईल फोन व रोख रक्कमेसह बॅग संबंधित भाविकाकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आली. हरवलेले साहित्य परत मिळाल्याने भाविकांनी संस्थान प्रशासन व सुरक्षा कर्मचाऱ्यांप्रती समाधान व्यक्त केले.दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत साईबाबा समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात सुरक्षा कर्मचारी जालिंदर बोर्डे यांना ४ हजार २०० रुपयांची रोख रक्कम सापडली. त्यांनीही कोणताही विलंब न करता ती रक्कम कार्यालयात जमा करून प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला.

या दोन्ही घटनांमधून श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची सजगता, कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकता अधोरेखित झाली आहे. भाविकांच्या गर्दीत हरवलेल्या वस्तू व रक्कम सुरक्षितपणे परत मिळणे ही बाब मोठा दिलासा देणारी ठरत असून सोमनाथ कसबे व जालिंदर बोर्डे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या