Sunday, June 7, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणतरसोद बोगद्याजवळील सर्व्हिस रोड जलमय; वाहनचालकांचे हाल, नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा!

तरसोद बोगद्याजवळील सर्व्हिस रोड जलमय; वाहनचालकांचे हाल, नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील तरसोद बोगद्याजवळील सर्व्हिस रोडवर अवकाळी पावसामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असतानाही अद्याप कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

भुसावळ–सुनसगाव मार्गे मलकापूरकडे जाणाऱ्या या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. याच परिसरात पेट्रोल पंप, शाळा, महाविद्यालय तसेच आयटीआय संस्था असल्याने विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिकांचा नित्याचा प्रवास याच मार्गावरून होत असतो. त्यामुळे पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे.अजून नियमित पावसाळा सुरू झालेला नसताना केवळ अवकाळी पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रस्त्याचे बांधकाम करताना गटारीचा योग्य मार्ग व पाण्याचा उतार व्यवस्थित न दिल्यामुळे पावसाचे पाणी साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

याशिवाय, रस्ता तयार करताना अतिक्रमण हटविण्याऐवजी अरुंद स्वरूपातच बांधकाम करण्यात आल्याने वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अपुरा ठरत आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढलेली रहदारी लक्षात घेता हा रस्ता अत्यंत लहान पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. समोरासमोर दोन मोठी वाहने आली तर एकमेकांना मार्ग देताना अडचणी निर्माण होत असून अनेकदा वाहनचालकांमध्ये वाद होण्याचे प्रकार घडत आहेत.या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बसेसही धावत असतात. मात्र रस्त्याची अरुंदता आणि पाणी साचण्याच्या समस्येमुळे चालकांना अडचणी येत असल्याने काही बसेस पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नशिराबाद शहरातील प्रवासी, कामगार, तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन सर्व्हिस रोडवरील पाणी साचण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या