जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव महानगरपालिकेच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून विद्यमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०२१ बॅचचे अधिकारी आदित्य जीवने यांची नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य शासनाने बुधवारी जाहीर केलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सध्या छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणमध्ये संयुक्त संचालक म्हणून कार्यरत असलेले आदित्य जीवने आता जळगाव महापालिकेच्या कारभाराची जबाबदारी सांभाळणार आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या संभाव्य बदलीबाबत प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर शासनाच्या आदेशानंतर या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे. मात्र, ढेरे यांची पुढील नियुक्ती नेमकी कोणत्या पदावर किंवा ठिकाणी करण्यात आली आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.दरम्यान, बदलीबाबत संपर्क साधला असता आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आदेश झाल्याचे मान्य केले. तथापि, प्रशासनाकडे अद्याप अधिकृत आदेशाची सविस्तर माहिती प्राप्त झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन आयुक्त आदित्य जीवने यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या विविध विकासकामांना आणि प्रलंबित प्रशासकीय विषयांना नव्या गतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

