नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद-उमाळा रस्त्यावरील भाग्यवर्धन कंपनीकडून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित व रासायनिक मिश्रित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांसह जनावरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.सदर कंपनीमध्ये वेस्टेजपासून पुठ्ठा निर्मिती तसेच प्लास्टिकच्या वापरलेल्या बाटल्यांपासून प्लास्टिक दाणा तयार करण्याचे काम केले जाते. मात्र या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उघड्यावर व रस्त्यावर सोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कंपनी परिसरालगतच्या पडीत जमिनीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी साचले असून हे पाणी रहदारी रस्त्याच्या काठाने वाहत जाऊन थेट खंडेराव मंदिर परिसरापर्यंत पोहोचत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, तक्रारीनंतर काही काळासाठी पाणी सोडणे बंद केले जाते. मात्र त्यानंतर पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरातील शेत व रानामध्ये गुरे चारण्यासाठी जात असतात. या दूषित पाण्याचे सेवन केल्याने यापूर्वीही गुरे दगावल्याच्या घटना घडल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.सध्या उघड्यावर साचलेल्या पाण्यावर जाळीसारखा थर तयार झालेला असून हे पाणी रासायनिक मिश्रित असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, नशिराबाद नगर परिषद तसेच संबंधित आरोग्य विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी देऊन चौकशी अहवाल मागविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष चौकशी न करता परस्पर संगनमताने प्रकरण दडपले जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील दूषित पाण्याची तपासणी करून संबंधित कंपनीला नोटीस देण्यात यावी तसेच सांडपाणी प्रक्रिया न करता उघड्यावर सोडण्यास बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

