Wednesday, June 10, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद आठवडे बाजारातील पावतीविना वसुलीवर चौकशीची मागणी; नगरपरिषद प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?

नशिराबाद आठवडे बाजारातील पावतीविना वसुलीवर चौकशीची मागणी; नगरपरिषद प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद नगरपरिषद क्षेत्रातील आठवडे बाजारात व्यापारी व विक्रेत्यांकडून शुल्क आणि जागाभाड्याची वसुली अधिकृत पावती न देता केली जात असल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण कोल्हे यांनी प्रशासनाकडे केली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका विभागातील सहाय्यक आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले असून यापूर्वीही नगरपरिषद प्रशासनाला याबाबत लेखी तक्रार देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आठवडे बाजारातील वसुलीदरम्यान व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची अधिकृत पावती दिली जात नसल्याने महसूल संकलन प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच संबंधित प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.नगरपरिषद कायद्यातील तरतुदींचा उल्लेख करत आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी आवश्यक दक्षता घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.या प्रकरणी स्वतंत्र चौकशी, विशेष लेखापरीक्षण, वसुली नोंदी व आर्थिक व्यवहारांची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच भविष्यात सर्व प्रकारची वसुली अधिकृत पावतीद्वारेच करण्याचे निर्देश देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.या आरोपांमुळे नगरपरिषदेच्या आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबत चर्चा सुरू झाली असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान याबाबत नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मात्र अधिक माहिती घेतली असता काही दिवसांपूर्वीच आठवडे बाजारातील टेंडर 7 लाख 51 हजार तर डेली बाजाराचे टेंडर 2 लाख 50 हजारात झाल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या