जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी धडक कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल २८ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि मालवाहू वाहन जप्त केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ९ जून २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, जळगाव शहरातून महामार्ग मार्गे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाणार आहे.
सविस्तर वृत्त पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻👇🏻
https://www.facebook.com/share/v/1DjSAkhUX1/
माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या डिझो पेट्रोलपंप परिसरात सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच-१९-सीएक्स-३२६०) या वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल सुगंधित गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.कारवाईदरम्यान २१ लाख ६१ हजार ६०० रुपये किंमतीच्या ५८ गोण्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाला तसेच ७ लाख रुपये किंमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण २८ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १५७/२०२६ दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील संबंधित कलमे तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७४, २७५ व २२३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.वाहन चालक जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल गिरीश पाटील व लाडवंजारी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

