जळगाव | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :-जळगाव-पाळधी रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून युवकांना मारहाण करत रोख रक्कम लुटणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जून २०२६ रोजी पहाटे १.३० ते ३.४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी चेतन प्रकाश पाटील (वय ३५, रा. खोटे नगर, जळगाव) हे आपल्या मित्रांसह मोटारसायकलवरून जळगाव-पाळधी रोडने जात होते. यावेळी हॉटेल साई गार्डन व हॉटेल राधिका परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर चार आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडवली.आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच चापट-बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील एकूण ७ हजार ८०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. यानंतर आरोपींनी मोटारसायकलीची तोडफोड करून घटनास्थळावरून पलायन केले.या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तातडीने डीबी पथक रवाना केले. पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत अवघ्या दोन तासांत चारही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर (वय २१, रा. संत मिराबाई नगर, जळगाव), उमाकांत दत्तात्रेय जाधव (रा. संत मिराबाई नगर, जळगाव), गौरव संजय जाधव (वय २१, रा. साई नगर, जळगाव) व रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर, जळगाव) यांचा समावेश आहे.पोलीस तपासात चेतन उर्फ बटाटा सुशीर हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच उमाकांत जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी तडीपार देखील करण्यात आले होते.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत डीबी पथकातील सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोलीस हवालदार योगेश पाटील, अविनाश देवरे, कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कोळी, दीपक देवरे, किरण पाटील तसेच वाहन चालक पोहेका पंकज देशमुख यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.

