पारोळा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील पिंपरखेड येथील मारोती मंदिरातून चांदीचा मुकुट व कानातील चांदीच्या मासोळ्या चोरी करणाऱ्या आरोपीला पारोळा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम पिंपरखेड येथील मारोती मंदिरात आला होता. काही वेळ मंदिरात थांबून दर्शन घेतल्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर मंदिराचे पुजारी आसाराम त्र्यंबक पाटील (रा. बहादरपूर, ता. पारोळा) यांनी मंदिर बंद करून विश्रांती घेतली.दि. ९ जून रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता मंदिराची साफसफाई करत असताना मारोती मूर्तीवरील ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट तसेच कानातील १५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मासोळ्या गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ६५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.याप्रकरणी पुजारी आसाराम त्र्यंबक पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात दि. ९ जून २०२६ रोजी सीसीटीएनएस गु.र.नं. २१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना सपोनि योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कैलास साळुंखे, पोहेकॉ संदीप अशोक सातपुते, पोकों अजय बाविस्कर, पोकॉ आकाश माळी, पोकॉ सुनील पाटील, पोकॉ अभिजित पाटील, पोकॉ गिरीश सोनवणे व पोकॉ अनिल राठोड यांच्या पथकाने मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला.तपासादरम्यान हिरापूर (ता. पारोळा) येथील हिरालाल अरुण पाटील यास ताब्यात घेण्यात आले. विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने दि. ८ जूनच्या रात्री मारोती मंदिरातील चांदीचा मुकुट व कानातील चांदीच्या मासोळ्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीच्या राहत्या घरातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाई करत आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ कैलास साळुंखे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच एसडीपीओ अमळनेर विभाग विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश महाजन व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडत गुन्ह्याचा छडा लावला.

